Menu

Arvind Paranjape

Author of books on Investment

Articles

आयुर्विमा पॉलिसी - का व कोणासाठी?
अरविंद शं. परांजपे
Monday, September 20, 2010 AT 04:49 PM (IST)

आयुर्विमा पॉलिसीचे प्रकार खूप असल्याने ज्या पॉलिसीत कमीत कमी हप्ता भरून जास्तीत जास्त विमा संरक्षण मिळेल ती पॉलिसी घ्यावी. "टर्म इन्शुरन्स'मध्ये जर पॉलिसी चालू असताना मृत्यू झाला तरच वारसांना रक्कम मिळत असल्याने त्याचा हप्ता सर्वांत कमी असतो. तुमच्यावर जे अवलंबून आहेत, त्यांची गरज किती असणार यानुसार तुमची विमा रक्कम ठरते. विमा ही गोष्ट वारसांच्या संरक्षणाकरिता असल्यामुळे हा खर्च आवश्‍यक समजला पाहिजे.

वयाच्या तिशीमध्ये असलेला राजू हा एक हुशार आणि कर्तबगार उद्योजक आहे. वाहनांचे सुटे भाग तयार करण्याचा कारखाना तो चालवतो. त्याची पत्नी अंजली एका बॅंकेत अधिकारी म्हणून काम करते. त्यांच्या दोन मुलांपैकी ईशा नुकतीच शाळेत जायला लागली आहे, तर मोठा यश आठवीमध्ये आहे. राजू आणि अंजली या दोघांची प्राप्ती (उत्पन्न) चांगली आहे, पण आपल्या कामामध्ये व्यग्र असल्यामुळे वेळेअभावी योग्य तऱ्हेने ते पैशांची गुंतवणूक करू शकत नाहीत. त्यामुळे जी कोणी जवळची व्यक्ती गुंतवणुकीचे अर्ज समोर आणते, त्यावर ते सह्या करून चेक देतात.

राजूच्या वडिलांनी तो कॉलेजमध्ये असतानाच त्याच्या नावाने एक विमा पॉलिसी घेतली होती, ज्याचे हप्ते आता तो भरतोय. त्यानंतर त्याच्या अगदी जवळच्या मित्राने त्याला एक विमा पॉलिसी विकली होती आणि अंजलीची मावशी ही विमा प्रतिनिधी असल्याने तिनेही तिला दोन पॉलिसी दिल्या होत्या. आज त्या दोघांच्या अगदी जवळचा मित्र ज्याने विमा प्रतिनिधी म्हणून नुकतीच सुरवात केली आहे, तो त्यांच्याकडे नवीन पॉलिसीचा प्रस्ताव घेऊन आला होता.

सुरवातीलाच "तुम्ही फारच कमी विमा उतरवलेला आहे,' असं विमा प्रतिनिधीने त्यांना ऐकवून आणि थोडासा हिशेब करून अजून इतक्‍या लाख रुपयांची पॉलिसी घ्यायला पाहिजे, असे घाबरवून सोडले. एवढेच काय पण तुमच्या मुलांच्या नावाने म्हणजे ईशा आणि यश यांच्याही नावावर पॉलिसी घेणे कसे आवश्‍यक आहे, हे पण पटवू लागला. राजू आणि अंजली हे आपल्या क्षेत्रात जरी तज्ज्ञ असले, तरी विमा आणि आर्थिक गुंतवणुकीचा त्यांनी विशेष विचार केला नव्हता. पण तेवढ्यात राजूला अर्थक्षेत्रात काम करत असलेल्या त्याच्या चुलत भावाची- श्रीरंगची आठवण झाली आणि त्याचा विचार घेऊनच पुढे जाऊ, असे त्यांनी ठरवले. त्याला भेटल्यावर, "विमा संरक्षण हा एकूण आर्थिक नियोजनाचा एक भाग असला पाहिजे, पण विमा मोफत नसल्याने आपल्याला त्याचा पुरेपूर फायदा मिळाला पाहिजे,' हे श्रीरंगने स्पष्ट केले.

विमा आवश्‍यक आहे का?
तो पुढे सांगू लागला. "प्रत्येकाला विम्याची आवश्‍यकता असतेच असे नाही. ज्यांच्यावर कोणाच्याही निर्वाहाची जबाबदारी नसेल किंवा ज्यांनी वारसांकरिता पुरेशी आर्थिक तरतूद केलेली असेल त्यांनी विमा उतरवण्याची आवश्‍यकता नाही. साधारणपणे, वयाची पहिली २५ वर्षे जेव्हा काही जबाबदारी नसते तेव्हा आणि ५८ वर्षांनंतर जेव्हा जबाबदाऱ्या संपतात तेव्हाही विम्याची आवश्‍यकता नसते.'

"म्हणजे आम्ही दोघे कमावतो आहोत आणि आमच्यावर आमची मुले अवलंबून आहेत, त्यामुळे आमचा विमा उतरवणे योग्य होईल. पण मुलांचा नको.' राजू म्हणाला.

""यश व ईशा हे अजून शाळेत असल्याने त्यांचा विमा उतरवण्याची गरज नाही, हे मला पटले; पण त्यांच्या शिक्षणाकरिता व लग्नाकरिता त्यांच्या नावावर पॉलिसी घ्यावी, असे सगळे म्हणतात,'' अंजली म्हणाली.

"मुलांचा विमा घेण्यापेक्षा त्यांच्या शिक्षणाच्या तरतुदीकरिता गुंतवणुकीचे इतर मार्ग आहेत. म्युच्युअल फंडातील "एसआयपी' हा अधिक चांगला मार्ग आहे.'

विमा किती रकमेचा हवा? 
"विम्याची आवश्‍यकता असेल तर किती रकमेचा विमा उतरवायला हवा, याचा विचार फारसा होत नाही. फक्त हप्ता किती बसतोय एवढेच बघितले जाते,' श्रीरंगने पुढचा मुद्दा सांगितला.

"आम्हाला कळलंय की आमच्या पगाराच्या १० किंवा २० पट रकमेचा किंवा आम्ही पुढच्या १५ वर्षांमध्ये किती रक्कम मिळवणार, त्याचा विमा उतरवायला पाहिजे,' अंजलीने तिची माहिती सांगितली.

"असे काही नाही. तुमच्यावर जे अवलंबून आहेत, त्यांची गरज किती असणार यानुसार तुमची विमा रक्कम ठरणार आहे. तुमच्या आजच्या किंवा भविष्यातील उत्पन्नावर नव्हे, हे लक्षात ठेवा. एवढेच नाही तर ती गरज मुले मोठी होईपर्यंतच राहणार असते. अशी रक्कम किती लागेल याचा तुम्ही अंदाज घ्यायला हवा. समजा, जर तुमच्या वारसांकरिता दर वर्षी दोन लाख रु. एवढी रक्कम पुढच्या १५ वर्षांकरिता हवी असेल, तर एकूण रक्कम ३० लाख रु. एवढी होईल. पण ती सर्व रक्कम काही पहिल्या दिवसापासून लागणार नाही. दर वर्षी दोन लाख रु. एवढीच रक्कम लागणार आहे. तशी रक्कम दर वर्षी मिळण्याकरिता ७ टक्के वार्षिक व्याजदराने २३ लाख रुपये बॅंकेत ठेवले, तर पुढची २० वर्षे वारसांना दर वर्षी दोन लाख रुपये मिळू शकतील व त्यानंतर ही रक्कम संपून जाईल.'

"म्हणजे आम्हाला फक्त २३ लाख रुपये एवढ्याच रकमेचा विमा उतरवावा लागेल?' राजूने अविश्‍वासाने विचारले. "त्यामुळे आमच्या विम्याची रक्कम कमी झाल्यामुळे आमचा हप्ताही कमी होईल,' राजूने हिशेबही केला. "बरोबर. याशिवाय तुम्हाला तुमच्या कंपनीकडून किंवा म्युच्युअल फंडासारख्या इतर प्रकारातून जर विमारक्कम मिळणार असेल, तर ती पण एकूण रकमेतून कमी केल्यास तो आकडा अजून कमी होईल.'

कोणत्या प्रकारची पॉलिसी घ्यावी?
"पॉलिसीचे प्रकार खूप असल्याने ज्या पॉलिसीत कमीत कमी हप्ता भरून जास्तीत जास्त विमा संरक्षण मिळेल, ती पॉलिसी घ्यावी. "टर्म इन्शुरन्स'मध्ये जर पॉलिसी चालू असताना मृत्यू झाला, तरच वारसांना रक्कम मिळत असल्याने त्याचा हप्ता सर्वांत कमी असतो. म्हणजे उदा. १० लाख रु. विमा रकमेला २० वर्षांच्या मुदतीकरिता वार्षिक तीन हजार एवढाच हप्ता बसतो. म्हणजे वार्षिक नऊ हजार रुपयांमध्ये ३० लाखांचे विमा संरक्षण मिळू शकेल.'

"मनीबॅक पॉलिसी किंवा बोनस मिळणाऱ्या एंडोमेंट प्रकारातील हप्ता टर्म इन्श्‍युरन्सपेक्षा खूपच जास्त असतो. त्यातल्या गुंतवणुकीवर ६-७ टक्के एवढाच परतावा मिळतो. एक सप्टेंबरपासून युलिप प्रकारात सुधारणा झाली असल्यामुळे त्यांचा विचार करायला हरकत नाही.'

पॉलिसी कोणाकडून घ्यावी?
"आमचा सरकारी विमा कंपनीवर विश्‍वास आहे. आम्ही खासगी विमा कंपनीकडून पॉलिसी घेतल्यास काही धोका आहे का?' राजूने विचारले.
"नाही. सर्वच विमा कंपन्यांवर विमा नियामक व विकास प्राधिकरणाचे (आयआरडीए) नियंत्रण असल्याने सरकारी कंपनीचा आग्रह धरण्याची गरज नाही. खासगी कंपन्यांकडून पॉलिसी घेण्यात धोका नाही, कंपनीपेक्षाही आपण आपल्याला योग्य असलेली पॉलिसी घेतो आहे की नाही व कंपनीकडून त्यावर किती शुल्क वसूल केले जाते, हे बघण्याची अधिक आवश्‍यकता असते. त्याकरता तुम्हाला तुमच्या गरजा काय आहेत, हे आधी माहीत हवे आणि पॉलिसीचा तपशील समजून घेऊन ती गरज पूर्ण होते का ते बघायला हवे.' "विमा ही गोष्ट आमच्या वारसांच्या संरक्षणाकरिता असल्यामुळे आम्ही हा खर्च आवश्‍यक समजला पाहिजे. पैसे उगाचच खर्च होतात ही समजूत चुकीची आहे,' अंजली म्हणाली.

"विम्याचा खरा उद्देश आणि त्याचे आर्थिक गणित आता आमच्या लक्षात आलं. यापुढे कोणाच्याही भिडेखातर पॉलिसी घ्यायची नाही, कितीही ओळख किंवा नाते म्हणून किंवा कोणाला मदत किंवा टार्गेट पूर्ण करण्यासाठी म्हणून विमा खरेदी बंद.' अंजली आणि राजू दोघेही एकदम म्हणाले.