Menu

Arvind Paranjape

Author of books on Investment

आयुर्विमा: किती आणि कशाकरता?

 

‘आयुर्विमा घेण्याचे महत्त्व बहुतेकाना समजले आहे, पण आपण घेतलेल्या पॉलिसीचे नक्की फायदे काय आहेत हे नीटसे माहिती नाही. त्यामुळे जास्त करून मुलांचे शिक्षण, लग्न याकरता बचत करणे आणि प्राप्तिकर वाचवण्याचे साधन  म्हणून पॉलिसी घेतली जाते.’
‘बहुतेकांचा कल बँक ठेवी, सोने यातील गुंतवणुकीपेक्षा आयुर्विम्यामध्ये गुंतवणूक करण्यावर आहे.’
‘साधारणपणे 64% पॉलिसी या पारंपारिक (एंडोमेंट प्लॅन) तर 19% युनिटलिंक्ड प्लॅन घेतल्या आहेत.’
‘59% पॉलिसी धारकांना मृत्युनंतर किती रक्कम मिळू शकेल हे माहिती नव्हते तर 68% पॉलिसीधारकांना पॉलिसीची मुदत संपल्यानंतर किती लाभ होणार हे माहिती नसते.’
‘फक्त 11% पॉलिसीधारकांनी स्वत:हून विमापॉलिसी घेतली आहे. 89% लोकांना ती ’विकली’ गेली आहे.’
‘बहुतेकांना विमा रक्कम ही पुरेशी नाही याची जाणीव आहे आणि त्याकरता ते अधिक पैसे खर्च करायला तयार आहेत.’
फिकी आणि कॅनरा बँक, एचएसबीसी ओबीसी विमा कंपनी यांनी सप्टेंबर 2015 मध्ये केलेल्या पहाणी अहवालतील हे काही निष्कर्ष आहेत. यावरून असे दिसते की सध्याच्या काळात आयुर्विमाविषयीची जागरुकता पूर्वीपेक्षा जरी वाढली असली तरीही त्याविषयीची अपुरी माहिती असल्याने त्याचा म्हणावा तसा उपयोग होत नाही. यापूर्वी एगॉान रेलिगेअर विमा कंपनीने केलेल्या पाहणीत असे दिसून आले होते की विमा पॉलिसी जरी खरेदी केलेली असली तरीही त्याची विमा रक्कम जरुरीपेक्षा बहुधा खूपच कमी असते. याचे प्रमुख कारण म्हणजे विमा नक्की कशाकरता याविषयी स्पष्टता नसल्याने मुलांसाठी तरतुद, प्राप्तिकरबचत अशा इतर गोष्टीवर भर दिला जातो. ज्या व्यक्तीच्या आयुष्यावर विमा उतरवलेला असतो त्या व्यक्तीच्या आकस्मिक निधनामुळे  त्यावर अवलंबून असणार्‍याना आर्थिक भरपाई देणे हा विम्याचा मु‘य उद्देश असतो.  अशी रक्कम जास्त असली पाहिजे हा मूळ उद्देश विमा उतरवताना लक्षात न घेतल्यामुळे विमा हप्त्यामधून गुंतवणूक, कर बचत इत्यादि अन्य बाबींकडे लक्ष दिले जाते. या मुळे विमा रक्कम म्हणजे सम अ‍ॅशुर्ड कमी होते आणि विम्याच्या मूळ उद्देशाला बाधा येते हे अनेकांच्या लक्षात येत नाही.

विमा घेण्यापूर्वी काही प्रश्‍नांची उत्तरे देऊन प्रत्येक विमाधारकाने आपला गृहपाठ केला पाहिजे. त्यानंतरच विमा प्रतिनिधीला भेटावे म्हणजे योग्य ते प्रश्‍न त्याला विचारून पुरेशी माहिती होऊ शकते. अनेक जण पॉलिसी घ्या म्हणून मागे लागतात आणि तगादा नको म्हणूनही अनेकदा पूर्ण विचार  न करता पॉलिसी घेतली जाते. तुम्ही एकदा फॉर्मवर सही करून चेक दिला की तुम्ही बांधील रहाता कारण विमा पॉलिसी हे एक लाँग़ टर्म काँट्रॅक्ट असतं. घेतलेली पॉलिसी तुमच्या गरजा पुर्‍या करणारी असली पाहिजे.  घेण्यापूर्वी तुम्ही स्वत:ला  हे प्रश्‍न विचारा. 

प्रश्‍न: 1 आपल्याला विमा आवश्यक आहे का?  
सर्वच व्यक्तींना सर्व काळ विम्याची आवश्यकता नसते. ज्यांच्यावर आर्थिक दृष्ट्या जर कोणी अवलंबून असेल तरच विमा पॉलिसी घेण्याचा निर्णय घ्यावा. तसेच ज्यांनी वारसांकरता पुरेशी आर्थिक तरतूद केलेली असेल त्यांनीही विमा उतरवण्याची आवश्यकता नाही.  जेव्हा काही जबाबदारी नसते (वयाची पहिली 25 वर्षे)तेव्हा आणि 55-60 वर्षांनंतर जेव्हा जबाबदार्‍या संपतात तेव्हाही विम्याची आवश्यकता नसते. त्यामुळे विद्यार्थीवर्ग व कमाई नसणार्‍या व्यक्ती यांना विम्याची आवश्यकता नसते.

प्रश्‍न 2: विमा किती रकमेचा काढायचा? (सम अ‍ॅश्युर्ड किती)
विमा आवश्यक आहे असे ठरल्यानंतर, तो किती रकमेचा असला पाहिजे याचा अंदाज घेणे महत्त्वाचे असते. तुमच्यावर जे अवलंबून आहेत त्यांची भविष्यकाळात किती रकमेची आणि किती वर्षे गरज असेल  यानुसार तुमची विमा रक्कम ठरणार आहे. याला ’नीड्स अ‍ॅनालिसीस’ म्हणतात. अशी गरज किती असेल हे ठरवताना अवलंबित व्यक्तींचा निर्वाह आणि शिक्षण खर्च अशा बाबींची तरतुद करावी लागेल. यामध्ये पुढे होणार्‍या भाववाढीचाही विचार केला पाहिजे. तसेच कर्ज घेतले असेल तर ती रक्कमही घ्यावी लागेल आणि मालमत्ता असेल तर ती रक्कम कमी करावी लागेल. खर्चाकरता आवश्यक रक्कम जर वर्षाला 4 लाख रूपये असेल आणि ही रक्कम 15 वर्षे हवी असेल तर  एकूण रक्कम - रू. 60 लाख एवढी होईल. पण सर्व रक्कम काही पहिल्या दिवसापासून लागणार नाही,  तर दर वर्षी 4 लाख मिळतील अशी सोय असणे आवश्यक असते. 46 लाख रुपये (नेट प्रेझेंट व्हॅल्यु- एनपीव्ही)    7 % वार्षिक व्याजदराने, बॅकेत ठेवले तर पुढची 15 वर्षे वारसांना दर वर्षी रू.4 लाख मिळू शकतील व त्यानंतर ही रक्कम संपून जाईल. तुमच्या आजच्या किंवा भविष्यातील उत्पन्नावर विमा रक्कम अवलंबून ठेवू नये. तसेच पगाराच्या 10 किंवा 20 पट रकमेचा विमा हवा या पेक्षा गरज किती असेल यानुसार विमा उतरवणे योग्य आहे. 
प्रश 3: कुठल्या प्रकारची विमा पॉलिसी घ्यावी? 
प्रकार 1 : टर्म प्लॅन
पॉलिसीचे प्रकार खूप असल्याने  योग्य पॉलिसी घेण्याचे महत्त्व खूप आहे. विम्याचा मु‘य उद्देश जोखीम संरक्षण असल्याने ज्या पॉलिसी प्रकारात कमीत कमी हप्ता भरून जास्तीत जास्त विमा संरक्षण मिळेल ती पॉलिसी घ्यावी. टर्म इन्श्युरन्स या प्रकारच्या पॉलिसीमधे जर पॉलिसी चालू असताना मृत्यु झाला तरच वारसांना विमा रक्कम मिळत असल्याने त्याचा हप्ता इतर प्रकारांपेक्षा तुलनेने कमी असतो. उदा: ऑनलाईन म्हणजे इंटरनेटवरून पॉलिसी खरेदी केली तर, 30 वर्षे वयाच्या व्यक्तीला, वर्षिक रू. 5,000  पेक्षाही कमी हप्ता भरून रू.50 लाख एवधे विमा संरक्षण पुढील 30 वर्षांच्या मुदतीकरता मिळू शकते. एजंट कडून घेतलेल्या पॉलिसीपेक्षा ऑनलाईन पॉलिसी स्वस्त असतात. ‘पॉलिसी काळात आपला मृत्यु झाला नाहीं तर भरलेले पैसे वाया जातील,‘ हा गैरसमज आहे. तो दूर करून टर्म इन्श्युुरन्स या प्रकाराकडेे सजग दृष्टीने बघावे. 

प्रकार 2: मनीबॅक किंवा बोनस मिळणार्‍या एंडोमेंट प्रकार.
या प्रकारातल हप्ता टर्म इन्श्युरन्सपेक्षा खूपच जास्त असतो, कारण या हप्त्यामधूनच गुंतवणूक होते. परंतु विमा कंपनी अशी गुंतवणुक फक्त सुरक्षित प्रकारांमध्ये करत असल्याने त्यावर साधारणपणे 6-7 % एवढाच परतावा मिळतो.गुंतवणूकही होत असल्याने या प्रकारात मिळणारे विमा संरक्षण टर्म प्लॅनपेक्षा खूपच कमी मिळते. परंतु बहुतेकांची मानसिकता हप्त्यामधून परतावा मिळावा अशी असल्याने या प्रकाराला अनेक जण पसंती देतात. खरं म्हणजे गुंतवणुकीकरता म्युच्युअल फंडासारखी अधिक परिणामकारक साधने मदतीला आहेत जी जास्त फायदेशीर आहेत. त्यामुळे या एंडोमेंट/ मनीबॅक प्रकारांची निवड न करता विम्याकरता टर्म प्लॅन आणि गुंतवणुकीकरता म्युच्युअल फंडातले एस आय पी करणे, असे धोरण आखावे.

प्रकार 3: युनिट लिन्क्ड इन्शुरन्स प्लॅन (युलिप)
युलिप प्रकारात एंडोमेंट प्रकारापेक्षा अधिक पारदर्शकता आहे. त्यानुसार, विमा हप्त्यातील  जोखीम संरक्षण, विमा कंपनीचा खर्च आणि  गुंतवणूक या 3 बाबींवर किती रक्कम खर्ची पडणार आहे हे जाहीर केलेले असते. मात्र याधली गुंतवणूकीची रक्कम म्युच्युअल फंडाच्या डेट,इक्विटी किंवा बॅलन्स्ड फंड योजनेसारखी गुंतवली जाते.त्यामुळे बाजाराप्रमाणे  युलिपमधे विमा संर्क्षण आणि गुंतवणूक असे एका दगडात दोन पक्षी मारले जातात. यात एंडोमेंट योजनांपेक्षा जास्त लवचिकपणा आहे. विमा संरक्षणाची हमी असते पण गुंतवणूूकीवरच्या परताव्याची हमी नसते. युलिप पॉलिसी घेतली तर ती थोड्या काळाचा विचार करून घेऊ नये तर  दीर्घ मुदतीसाठी (10 वर्षांपेक्षा अधिक) घ्यावी. आय आर डी ए (विमा प्राधिकरण) ने 2011 नंतर यात अनेक वदल केल्यामुळे यातील खर्चावर आता नियंत्रण आले आहे. परंतु अनेकदा या प्रकारच्या योजना कोठल्याही वयाच्या व्यक्तीला विकल्या जातात, हे टाळायला पाहिजे. या प्रकारातील नियम आणि क्लिष्टता लक्षात घेता ज्यांना फक्त गुंतवणूक करायची असेल त्यांनी युलिपचा विचार न करता म्युच्युअल फंडाचा पर्याय निवडणे अधिक योग्य ठरेल. काही कंपन्या ऑनलाईन पद्धतीनेही युलिप विक‘ी करतात.

प्रश्‍न 4 . पॉलिसीची मुदत किती असावी?
तुमच्या वारसांची  आर्थिक गरज  जितकी वर्षे असेल तेवढ्या मुदतीकरताच पॉलिसी निवडणे इष्ट असते.  साधारण तुमच्या वयाची 55-60 वर्षे उलटल्यानंतर तुमच्या जबाबदार्‍या संपलेल्या असतात. त्यानंतरच्या मुदतीकरता विमा संरक्षणाची गरज नाही. तसंच लहान मुलांचाही विमा काढण्याची गरज नाही, कारण त्यांच्यावर आर्थिक दृष्ट्या कोणी अवलंबून नसते.

प्रश्‍न 5. पॉलिसी खाजगी कंपनीची घ्यावी का?
कंपनीची निवड करताना सरकारी कंपनीला म्हणजे एल आय सी जास्त विश्‍वासार्ह आहे म्हणून तिला प्राधान्य द्यावे असे अनेकांचे मत असते. पण आपल्या देशात  2002 नंतर सुरु झालेल्या सर्वच खासगी विमा कंपन्यांवर विमा प्राधिकरणाचे नियंत्रण असते.  त्यामुळे फक्त सरकारी कंपनीच विश्‍वासार्ह आहे असे नाही. एकूण 25 कंपन्या असल्याने निवडीला भरपूर वाव आहे. 3 वर्षांनंतर कुठलाही क्लेम नाकारता येत नसल्याने, जी कंपनी कमी हप्ता घेऊन अधिक संरक्षण देते आणि कंपनी चांगली सेवा देते अशा कंपनीची निवड करायला हरकत नाही. तसेच फक्त विमा प्रतिनिधीवर अवलंबून न रहाता कंपनीची जवळची शाखा कुठे आहे आणि ती आणि अन्य महत्त्वाची माहिती करून ध्यायला पाहिजे. तसेच बॅकेच्या शाखेतून पॉलिसी घेतल्यास तुम्हाला पूर्ण पॉलिसीकाळातही सेवा मिळेल याची खात्री करून घ्यावी. कारण अनेकदा विक‘ी केल्यानंतर विक‘ेता असलेला बॅक कर्मचारी नोकरी बदलतो किंवा त्याची बदली होते.
 

खरेदीचा पुनर्विचार?
तुम्ही पॉलिसी खरेदी केल्यावर अशी पॉलिसी तुम्हाला मिळाल्यापासून 15 दिवसात तुम्ही ती कुठल्याही कारणाने रद्द करू शकता.या 15 दिवसांच्या ‘फ‘ी लूक पिरियड‘ मधे पॉलिसी रद्द करून तुम्ही भरलेला हप्ता(खर्च वजा करून) तुम्हाला परत मिळतो.

जरुर तेव्हा सल्लागाराची मदत घ्या.
तुमच्या अर्थ नियोजनातच विम्याचा समावेश असणे चांगले असते. आयुष्याच्या टप्यांवर होणारे बदल लक्षात घेऊन त्याप्रमाणे योग्य ते नियोजन करण्याकरता चांगल्या स‘गाराची मदत घ्या. प्रत्येक विमा कंपनीची वेबसाईट असतेच. पण त्याबरोबरीने इतरही वेबसाईट्स जरूर बघ्याव्यात. (उदा: आयआरडीएइंडिया.ओआरजी, आयसेव्ह्.कॉम, पॉलिसी बझार.कॉम इ.)  विमा पॉलिसींची पूर्ण माहिती आनि त्याचे उदाहरण या वेबसाईटवर मिळते. ते वाचुन घेऊन मगच निर्णय घ्या. कोणाच्याही तोंडी आश्‍वासनांवर विश्‍वास ठेवू नका आणि विमा कंपनीच्या अधिकृत पत्रकातीलच माहिती विचारात घ्या. तसेच विम्याच्या पॉलिसीचा अर्ज स्वत: भरणे योग्य असते, पॉलिसी आल्यानंतर  निदान त्यातील महत्त्वाच्या बाबी काय आहेत हे तपासून बघावे. अनेक वेळा असे दिसते की  (नातेवाईक, मित्र, ओळखीतून आलेल्या नवीन एजंटला उत्तेजन द्यायला, मदत करायला अथवा त्यांचे टार्गेट पूर्ण करायला पॉलिसी विकली जाते. अनेकदा असे नवशिके एजंट पुढे काम बंद करतात आणि त्यांनी विकलेली ती पॉलिसी निराधार होते. त्यामुळे व्यावसायिक, विश्‍वासु आणि अनुभवी एजंटकडूनच पॉलिसी घ्यावी. क्लेम करताना किंवा अन्य काही समस्या आल्यास त्यावेळी फायदा होतो.

*****